लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलिस दलाने हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन आॅलआऊट’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत २ फेब्रूवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेलूबाजार (ता.मंगरूळपीर) येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक करण्यात आली. तसेच ७२ हजार ५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.शेलूबाजार येथील अकोला रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायत संकुलामध्ये कॅरम मनोरंजन केंद्रात जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ फेब्रूवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शिताफीने नमूद ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी सुनील महादेव लांभाडे, गणेश राजेंद्र हाफसे, सुरेश तुळशीराम घुसळे, राम नंदकिशोर लांभाडे, विष्णू सुदाम कावले, अरविंद नथ्थुजी तिरके, विनोद रामप्रसाद वैद्य, अमोल भागवत बोबडे, सै.अख्तर सै मस्तान सर्व (रा.शेलुबाजार) आणि राहुल अनिल बामनीकर (रा. तिरुपतीनगर, हिंगोली) हे १० जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ७२ हजार ५० रुपये पंचासमक्ष जप्त करूनआरोपींना मंगरूळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कलम १२ ‘अ’ जुगार अॅक्टअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 2:46 PM