लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) येथील बाळकृष्ण ज्ञानबा बोरकर आणि राजाराम ज्ञानबा आरू या दोन अवैध सावकारांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधकांनी गठीत केलेल्या तीन पथकांनी शनिवार, १९ जानेवारीला सकाळी धाडी टाकून झाडाझडती घेतली. यात ७० पेक्षा अधिक अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यात कोरे धनादेश, खरेदी खत, डायºया, वह्यांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात प्रशासनाला तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये अवैध सावकारीसंदर्भात कारवाईच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या असून, मिळालेल्या माहितीवरून १९ जानेवारीला सकाळी १० वाजता तीन पथकांमधील सहकार विभागाच्या २५ अधिकारी व कर्मचाºयांनी रिठद येथील बाळकृष्ण बोरकर व राजाराम आरू यांच्या घरावर अचानक धाडी टाकून अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त केले. या धाडसत्रामध्ये जप्त केलेल्या दस्तावेजाची तपासणी करुन रक्कमेच्या निश्चितीबाबत महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड यांच्यामार्फत तपास सुरु आहे. त्यानंतर संबंधित अवैध सावकाराच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी सांगितले. ही कारवाई रिसोड येथील सहायक निबंधक एम.बी. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक जी.बी. राठोड, सहकार अधिकारी एन.डी.धार्मिक यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी केली. पंच म्हणून अकोला व वाशिम जिल्हा कृषी पतसंस्थेचे बी.एन. मोरे, बी.के. सरनाईक, जी.बी. हाडे, डी.ए. मुंढे, बी.टी. धांडे यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे अवैध सावकारीच्या क्षेत्रात सक्रीय असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 4:46 PM