लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यंदा पावसाने कमी- जास्त प्रमाणात तालुक्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. यासोबतच हवामान खात्याकडून यावर्षी दमदार पाऊस होणार असल्यााचे संकेत मिळत होते. हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून तालुक्यातील ७० हजार १०० हेक्टरपैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी केली; परंतु १५ जुनपाससून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे काही अंकुरले तर काही वसुंधरेच्याा कुशीतून बाहेर आले; मात्र या इवल्याशा पिकांना पाणी नसल्याने व दुपारी तापमानात वाढ होत असल्याने पिके कोमजली जात असून, संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारंजा तालुक्यात एकूण आठ महसूल मंडळे असून, त्यामध्ये कारंजा, कामरगाव, धनज, खेर्डा हिवरा लाहे, येवता बंदी, पोहा व उंबर्डा, बाजार या मंडळचा समावेश आहे. यातील प्रत्येक महसूल मंडळापैकी काही गावात १५ जून रोजी पाऊस आल्याने १६ जूनपासून पेरण्यांना वेग आला. काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने आगामी काळात पाऊस येईल, या आशेने कारंजा तालुक्यातील एकूण ७० हजार १०० हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास ५० हजार हेक्टरवर म्हणजेच ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. तर उर्वरित क्षेत्रावरील खरिपाची पेरणी रखडली आहे. कारंजा तालुक्यात आतापर्यंत ९९.५२ तर मंडळनिहाय ९१.११ पर्जन्यमान झाले आहे. अशातच गुरुवारी २२ जून रोजी सायंकाळी कारंजा शहरासह काही भागात पाऊस आल्याने या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी पेरणी केलेल्या पिकांना त्यानंतर पाऊस न आल्याने धोका निर्माण झाला आहे तर २२ जून रोजी आलेला पाऊस सार्वत्रिक नसल्याने ज्या भागात पाऊस पडला ती पिके सोडून इतर भागातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नाही तर पेरण्या उलटू शकतात; मात्र असे असले तरी आणखी काही दिवस पाऊस न आल्यास पाऊस पडलेल्या भागातील पिकेदेखील संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांनी दिली.
पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: June 30, 2017 1:31 AM