जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शिरपूर ते वाशिम रस्त्यावरील ब्राह्मणवाडा येथील नाल्यावरील पुलाचा एक भाग वाहून गेला. तेव्हापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. मात्र, काही प्रमाणात पुलाचा भाग कायम असल्याने दुचाकी वाहतूक सुरू होती. या धोकादायक पुलावरून शेकडो शासकीय कर्मचारी, व्यापारी, शालेय विद्यार्थी व नागरिक दुचाकीने शिरपूर -वाशिम -शिरपूर असा प्रवास करीत असत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यातच मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवार १९ ऑगस्ट रोजी पुलाचा उरलासुरला भागही पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शिरपूर - वाशिम रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीसह परिसरातील इतरही पूल पावसामुळे खचून गेले आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.
०००००००००००
पूल दुरुस्तीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
पूल दुरुस्तीसंदर्भात २२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला मुठ्ठा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश चांडे यांनी निवेदन दिले होते. मात्र, याकडे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. ब्राह्मणवाडा येथील वाहून गेलेल्या पुलामुळे ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती निलेश चांडे यांनी दिली आहे.