वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या वरूणराजाची यंदा मात्र चांगलीच कृपादृष्टी होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या पूर्वाधातच वार्षिक सरासरीच्या २०.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून, या तालुक्यात १ जून ते ११ जूनदरम्यान २५९.७० मि.मी. पाऊस पडला असून, हे प्रमाण तालुक्याच्या वार्षिक सरासरीच्या ३३.३४ टक्के आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी ८४ टक्के पाऊस पडला होता. आता यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात १ जून ते ११ जूनदरम्यान १६५.८३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या २०.७६ टक्के आहे. जूनच्या पूर्वाधातच पावसाचा जोर राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवातही केली आहे. जूनच्या सुरुवातीपूर्वी कृषीसेवा केंद्रांकडे फिरकूनही न पाहणारे शेतकरी आता मात्र कृषीसेवा केंद्रांवर बियाणे, खते आणि पेरणीच्या इतर साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जूनच्या पूवार्धात पावसाचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:13 PM