लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार, २६ जुलैपासून जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम स्वरुपात सुरू असलेल्या पावसाचा जोर पाचव्या दिवशी अर्थात मंगळवारी वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत काहीअंशी वाढ झाली असून नदी-नाले वाहायला लागले आहेत. दरम्यान, २९ जुलैला झालेल्या पावसाची सरासरी नोंद ५४ मिलीमिटर इतकी घेण्यात आली.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. यावर्षी मात्र जून महिना बहुतांशी कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या २५ तारखेपर्यंतही पावसाचा थांगपत्ता नव्हता. यादरम्यान हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शुक्रवार, २६ जुलैपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली. तेव्हापासून आजपर्यंत रिमझिम स्वरूपात का होईना पावसाची रिपरिप कायम आहे. जिल्ह्यातील वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या सहाही शहरांसह ग्रामीण भागातही हा पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांना संजीवनी मिळून पिके चांगलीच बहरली आहेत. सोबतच कोरड्या पडलेल्या धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत असून जलयुक्त शिवार आणि सुजलाम्-सुफलाम् अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात खोदण्यात आलेले शेततळे, नाले, सलग समतल चर, ढाळीचे बांध आदींमध्ये पाणी साठवण होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
वार्षिक सरासरी गाठायला आणखी हवा ६४ टक्के पाऊसजिल्ह्यात दरवर्षी साधारणत: सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. त्यानुषंगाने गतवर्षी १ जून ते २९ जुलै या कालावधीत वार्षिक सरासरीच्या तब्बल ५०६.५४ मिलीमिटर पाऊस झाला होता. त्यात सर्वाधिक प्रमाण मालेगाव तालुक्यात (५५० मिलीमिटर) होते. यंदा मात्र संपूर्ण जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण तुलनेने अत्यंत कमी असून २९ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २९३.०६ मिलीमिटर पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी ३६ असून वार्षिक सरासरी गाठायला आणखी ६४ टक्के पाऊस होणे गरजेचे आहे. तेव्हाच जिल्ह्यातील धरणेही भरली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पिकांची स्थिती उत्तमपाण्याअभावी खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते; मात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा धोका टळला असून सद्य:स्थितीत पिकांची स्थिती तुलनेने उत्तम असलयची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.