वाशिम: यंदा बिपरजॉय चक्रिवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात २७ तारखेपर्यंत केवळ ४५.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण अपेक्षीत सरासरीच्या केवळ ३४.२० टक्के आहे. अर्थात यंदा आजवर अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत पावसाची ६५.८० टक्के तूट असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून सष्ट होत आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी ७४५ मि.मी. पाऊस पडतो, तर जून महिन्यात सरासरी १३२. ८० मि.मी. पाऊस अपेक्षीत असतो. गतवर्षी १ जून ते २७ जूनच्या कालावधित ९२.२० मि.मी. पाऊस पडला होता. हे प्रमाण अपेक्षीत सरासरीच्या ६१.५० टक्के होते.
यंदा मात्र २७ जूनपर्यंत केवळ ४५.४० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण अपेक्षीत सरासरीच्या केवळ ३४.२० टक्के आहे. मि.मी.च्या तुलनेत सर्वाधिक ६१.०० मि.मी. पाऊस मालेगाव तालुक्यात पडला आहे. तथापि, मालेगावातील पावसाचे प्रमाण अपेक्षीत सरासरीच्या ४२.३० टक्के आहे. टक्केवारीच्या तुलनेत मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ४७.६० टक्के पाऊस पडला. या तालुक्यात २७ जूनर्यंत ५९.३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.अद्याप पेरणी योग्य पाऊस नाही
शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात मात्र केवळ ४५.४० मि.मी. पाऊस पडला असून, पावसाचे हे प्रमाण पेरणीयोग्य नाही. शेतकऱ्यांनी मात्र, खरीप पेरणीला वेग दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाचा खंड पडल्यास पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सर्वात कमी पाऊस रिसोड तालुक्यात
गत तीन वर्षांत पावसाळ्याच्या सुरुवातीला रिसोड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली हाेती. यंदा मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात २७ तारखेपर्यंत केवळ ४७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण अपेक्षीत सरासरीच्या केवळ ३१.९० टक्के आहे. तथापि, टक्केवारीच्या तुलनेत सर्वात कमी २८.८० टक्के पाऊस वाशिम तालुक्यात पडला आहे.