वाशिम : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने सलग दुसर्या दिवशीही मंगळवार, २६ जुलैला हजेरी लावली. तथापि, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात होत असलेल्या या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पिकांना धोका उद्भवला असून, जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर रात्रीच्या सुमारास विश्रांती घेतली. मंगळवारी पुन्हा दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास धुवाधार कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी वाहत असून, सर्वच जलस्रोतांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेलुखडसे (ता. रिसोड) या गावाला पुराने वेढल्यामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरा पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम शहरातील शिवाजी चौकस्थित छोट्या नाल्यांनादेखील मोठा पूर आला. या पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम प्रकल्पांसह १२२ लघू प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्यासोबतच नव्याने उभारण्यात आलेल्या पैनगंगा नदीवरील अकराही बॅरेजेस प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, यंदा पावसाने दरवर्षीची सरासरी ओलांडली असून, पावसाचे अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाण झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना काहीअंशी धोका संभवत असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात दुस-या दिवशीही संततधार पाऊस!
By admin | Published: July 27, 2016 12:53 AM