लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात शुक्रवार, २१ जून रोजी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन सुखावले असून नागरिकांना उकाड्यापासून काहीअंशी दिलासा मिळाला आहे; मात्र खरीपातील खोळंबलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढून ४५ अंशापलिकडे गेला. दुसरीकडे लघू आणि मध्यम असे सर्वच प्रकल्प कोरडे पडण्यासह विहिरी, हातपंप, कुपनलिकांनीही तळ गाठल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमधील नागरिक अक्षरश: वैतागले. अशातच पावसाळ्याला सुरूवात होवूनही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकºयांचा जीव कासाविस झाला. दरम्यान, २१ जून रोजी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात काहीठिकाणी पाऊस कोसळला. या पावसामुळे खोलवर गेलेल्या जलस्त्रोतांच्या पातळीवर कुठलाही फरक पडणार नसला तरी वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीपातील खोळंबलेली पेरणीची कामे सुरू होण्यासाठी मात्र मोठ्या तथा संततधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाचे आगमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 5:31 PM