शिरपूर परिसरात १९ मार्च रोजी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने अगोदरच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीतून जे काही वाचले त्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. मात्र १९ मार्चपासून सलग २३ मार्चपर्यंत पाच दिवस थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने जे काही शिल्लक होते तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाचे कांदा बिजवाई पीक, भाजीपालावर्गीय पीक, गहू, मका, ज्वारी तसेच टरबूज, खरबूज, केळी,आंबा नींबू, चिकू,पपई फळबागांचे १९ मार्च रोजी झालेल्या गारपीट व वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. यातूनही जे काही थोडेफार वाचले होते ते सावरण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत होते. मात्र सलग पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोड्याफार पावसाने यामध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच हळद काढणीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड व्यत्यय येत आहे. निसर्गाच्या या लहरी पणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च व कष्ट केल्यानंतर हातातोंडाशी येणारे पीक नैसर्गिक संकटामुळे हातचे निघून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. १९ मार्चपासून निर्माण झालेले ढगाळ व पावसाळी वातावरण कधी बदलणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. बँकांचे बिनव्याजी पीक कर्ज भरण्याच्या मुदतीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. त्यातच गारपिटीने नुकसान झाले. आता पीक कर्ज कसे भरावे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
..............................
नुकसान भरपाईची मागणी
शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद अशी खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकांकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.