मंगरूळपीर तालुक्यात १ जून ते ३० जूनदरम्यान सरासरी १३८.४ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात यंदा मात्र याच कालावधीत ३०३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. अर्थात पावसाचे प्रमाण सरासरीच्या दुपटीहून अधिक असले, तरी पावसात सातत्य नव्हते. जून महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यांतच तालुक्यात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने पाठच फिरविली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पेरणीनंतर डोलदार झालेली पिके आता सुकू लागली आहेत. शिवाय पावसाअभावी अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. दरदिवशी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असून, येत्या चार-पाच दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. ------------------
मजुरांना हाताला काम मिळेना
मंगरूळपीर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली असून, अनेकांची पेरणीही खोळंबली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले असून, शेतीमधील कामेही बंद असल्याने आता शेतमजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
-----------------------
पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके माना टाकत असून, पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत. त्यातच दररोज कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. अशात पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेऊन धडपड करीत असल्याचे दिसत आहे.