यंदा जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान लाभले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांनाही प्रारंभ केला. जिल्ह्यात ७८ पेरण्याही झाल्या. आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यात कापसाची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ते आता धास्तावले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात यंदाही सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे; पण आता या पिकांचे भवितव्य संकटात सापडले आहे. सुरुवातीला जमिनीत ओल होती त्यामुळे पेरण्या झाल्या. जमिनीत ओल असल्याने पेरण्यांचा वेगही खूप होता. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात पेरणीचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही अपवाद वगळता जिल्ह्यात आता बहुतांश ठिकाणी पेरणी झालेली आहे. ही पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याला दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र असा पाऊस आता दडी मारून बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
---------
पीक वाचविण्यासाठी ठिबकचा आधार
कोठारी: जुनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला, मात्र नंतर पावसाने चांगलीच दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कोठारी परिसरातील काही भागात सोयाबीन उगवलेच नाही तर काही भागात उगवलेले सोयाबीन सुकत असून, हे उगवलेले सोयाबीन पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात काही शेतकरी ठिबक सिंचनाचा आधार घेत असल्याचे चित्र कोठारी परिसरात दिसत आहे.