वाशिम : यंदाही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला असून, या आपत्तीतून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. सोयाबीनचा एकरी उतारही (उत्पादन) बऱ्यापैकी आहे. मात्र, बाजारभावात घसरण सुरूच आहे. शनिवारी ५५००-७२०० असलेला बाजारभाव सोमवार, २० सप्टेंबर रोजी ५०००-६२०० प्रती क्विंटल होता. सुरुवातीला पावसाने झोडपले, त्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनाने तारले आणि आता अल्प बाजारभावाने मारले, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव ११ हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभावात घसरण सुरू झाली आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी तर बाजारभाव सव्वासहा हजारांवर येऊन ठेपले आहेत. शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला होता. सोमवारी ५७५०-६२०१ असा दर मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. एका दिवसातच हजार रुपयाने दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनला फटका बसला. अशा परिस्थितीतही सोयाबीनच्या उत्पादनात फारशी घट आली नाही. एकरी उतार ७ ते १२ क्विंटलदरम्यान येत असल्याने ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अल्प बाजारभावाने निराशा टाकल्याचे दिसून येते. बाजारभावात आणखी घसरण सुरूच राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
.......
लागवड खर्चानुसार बाजारभाव असावा !
एकीकडे लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत असल्याने शेतीचे ताळतंत्र बिघडू नये म्हणून बाजारभावही समाधानकारक असावा, अशी अपेक्षा पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब खरात, चिखली येथील संजयकुमार सरनाईक, रमेश अंभोरे, नागठाणा येथील महादेव सोळंके, रिठद येथील नारायणराव आरू आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक, मजुरी, मशागत खर्चात ज्या पटीने वाढ होत आहे, तशाच पद्धतीने शेतमालाच्या दरातही वाढ व्हावी, असा सुर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.