वाशिम: अयोध्यानगरीत २२ जानेवारी प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने २१ जानेवारी रोजी रिसोड शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेने रिसोडनगरी दुमदुमून गेली होती. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या धाममध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. यानिमित्ताने रविवारी (दि.२१) सायंकाळी ४:३० वाजता शहरातील वाशिम नाका येथील जिजामाता चौक येथे टॉवरवर मोठा भगवा ध्वज फडकवून शोभायात्रेला सुरूवात झाली.
सिव्हील लाईन मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोनार गल्ली, जैन मंदिर, अष्टभुजा देवी मार्ग, आप्पा स्वामी महाराज चौक असे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. शोभायात्रेमध्ये भगवे पताके, हिंदुध्वज, कलशधारी महिला, पुरूष भजनी मंडळ, लेझीम पथक, रामजन्मभूमी चित्ररथ, बँड पथक, महिलांची रॅली, वाजंत्री, भजन मंडळी, पुरुष रॅली व या रॅलीच्या शेवटी प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती असे सादरीकरण झाले. शोभायात्रेत सकल हिंदू समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती. शोभायात्रेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भव्यदिव्य शोभायात्रा निघाली असून, शोभायात्रेतील गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाल्याच्या प्रतिक्रिया भाविकांमधून उमटल्या.