वाशिम : मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील पूलाजवळील शेतात जाणारा रस्ता करावा, विठोली येथील पुलामुळे शेतीचे नुकसान होऊ नये, याकरीता उपाययोजना कराव्या आदी मागण्यांसाठी २६ जून रोजी बेलोरा येथील पुलावर भर पावसात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अकोला ते आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मानोरा तालुक्यातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलेला आहे. मानोरा ते दिग्रस दरम्यान बेलोरा येथे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणद्वारा कंत्राटदार कंपनीकडून महामार्गाची निर्मिती दरम्यान विठोली व बेलोरा येथील खोराडी नदीवर प्रचंड उंचीच्या दोन पुलांची निर्मिती करण्यात आली. विठोली येथील पुलामुळे दरवर्षी शेतात पाणी शिरून नुकसान होते व बेलोरा येथील उंच पुलाशेजारच्या शेत शिवारात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची निर्मिती करण्यात न आल्याने येथील काही शेतकऱ्यांना शेत कसण्यात अडथळा येतो. शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा आणि विठोली व बेलोरा येथील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्या या मागणी साठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने संजय महाराज यांच्या नेतृत्वात बेलोरा येथील पुलावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात संजय महाराज, परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड, माजी सरपंच रामराव चव्हाण, संतोष राऊत,गजानन पाटील, सुधाकर राऊत,निलेश पाटील, गजानन गावंडे, गणेश ठोंबरे, महादेव ठोंबरे, मुंगशीराम उपाध्ये, अजय उपाध्ये, विनायक उपाध्ये उपस्थित होते.
लेखी आश्वासन मिळाले -तहसीलदार गजानन हामंद यांनी आंदोलनकर्त्यांशी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपस्थित यवतमाळ येथील कनिष्ठ अभियंता एस.एम. कोसरकर यांचेशी चर्चा केली. दोन्ही ठिकाणच्या पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांची समस्या सोडण्यासाठी योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.