लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव पो स्टे (वाशिम): मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आलेल्या कुंभी ते धानोरा रस्त्याची अल्पावधीतच दैना झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता असल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली असून, त्याची दखल न घेतल्यास ३० नोव्हेंबर रोजी धानोरा परिसरातील शिवणी दलेलपुर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी ते धानोरा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आले; परंतु अल्पावधीतच या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. अशात खड्डे वाचवून समोरच्या वाहनाला मार्ग देण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. या प्रयत्नात एखादवेळी मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. दरम्यान, सद्यस्थितीत मंगरुळपीर ते धानोरा मार्गाची दुरुस्ती करण्यात येत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभी ते धानोरा रस्त्याची अवस्थाही लक्षात घ्यावी आणि अपघाताचा धोका टाळण्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी विष्णू फड, शाकिर मो जहिर, संदीप ठाकरे, उत्तम कुटे, अशफाक डॉक्टर, जाबिर शेख, आलिम सत्तार, राजमंगल भेंडेकर, बाजीराव भेंडेकर, गणेश भेंडेकर, गणेश कोकरे, स्वानंद भेंडेकर, योगेश भेंडेकर, सुधाकर भेंडेकर,अमर भेंडेकर, रामेश्वर ठाकरे, सचिन ठाकरे, आशीष खडसे, संतोष भालेकर यांच्यासह कुंभी, नांदगाव, शिवणी आणि आसेगावसह परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याची दखल न घेतल्यास येत्या ३० नोव्हेंबर रोजी शिवणी दलेलपूर फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
खड्ड्यांमुळे रुग्णांच्या जिवाला धोकाकुंभी ते धानोरा रस्त्यावर पडलेले खड्डे वाचविताना वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहेच; परंतु गंभीर आजारी असलेल्या किंवा अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती किंवा गरोदर महिलेस वाहनांतून आरोग्य उपकें द्र वा खाजगी दवाखान्यात नेतेवेळी चालकांना मोठी काळजी घेत वाहन चालवावे लागते. अशात रस्त्यावरील खड्डे मोठा अडथळा ठरून रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे संबंधित रुग्ण किंवा अपघातातील जखमी व्यक्तीचा जीवही धोक्यात येण्याची भिती आहे. या गंभीर बाबीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणीही परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.