वाशिम : राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी समनक जनता पार्टी व शाळा बचाव समितीच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक चौक, वाशीम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. वाशीम येथे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचा शासन निर्णय नुकताच शासनाने काढला आहे.
तसेच सरकारी नोकर भरती ही खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. हे दोन्हीही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला खाईत लोटणारे आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. दोन्ही निर्णय तात्काळ रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणेच सरकारी नोकरभरती करावी, शिक्षणाचे राष्ट्रीयिकरण करावे.
तसेच यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेल्या आयएएस दर्जाच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, आमदार आणि खासदारांची पेन्शन रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कराववी, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन भर पावसात करण्यात आले. काही वेळ या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.