लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व नागरिकांना समाविष्ठ करणे, सर्वांसाठी साखर, रॉकेल देण्यात यावे, यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदार एकवटले असून, १८ जुलै २०१७ रोजी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन आहे. या आंदोलनाची रुपरेषा आणि वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा सहभाग यासंदर्भात बुधवारी वाशिम येथे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बैठक पार पडली.देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट करणे, धान्य न देता रोख सबसिडी सरळ लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याला विरोध करणे, सर्वांसाठी साखर व रॉकेल देणे, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकाच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर वितरण करणे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये भरघोस वाढ करणे किंवा त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, रेशन कार्डधारकांना आधार कार्डची सक्ती न करणे यासह अन्य मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १८ जुलै रोजी दिल्ली येथील रामलिला मैदानावर संघटीतपणे देशभरातील परवानाधारक रेशन दुकानदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार आहेत, अशी माहिती वाशिम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार तथा केरोसीन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तान्हाजी काळे यांनी दिली. दिल्ली येथील देशव्यापी आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील अधिकाधिक रेशन दुकानदार सहभागी होतील, या दृष्टिने आतापासूनच नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काळे यांनी केले.विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे राज्यव्यापी आंदोलन आहे. सदर आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त रेशन दुकानदारांचा सहभाग राहणार आहे. यासाठी प्रत्येकाला आवाहन केले जात आहे.-तानाजी काळे, जिल्हाध्यक्षस्वस्त धान्य दुकानदार संघटना, वाशिम
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार एकवटले!
By admin | Published: June 29, 2017 1:23 AM