वाशिम : मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या वाशिम जिल्ह्यातील चार तालुक्यात तीन वर्षापासून हा निर्देशांक वाढविण्यासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या साडेचार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम तालुक्याचा आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक निर्देशांक वाढविण्याच्या योजनांना आता वेग येणार आहे. वास्तविक हा निधी जिल्ह्यास जून महिन्यात मिळणे अभिप्रेत होते; मात्र तो वेळेत उपलब्ध न झाल्याने मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या जिल्ह्यातील योजनांना खीळ बसली होती. अखेर हा निधी १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यास मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निधी मिळण्याचे संकेत पूर्वीच प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने हा निधी आता मिळाला आहे. वाशिम जिल्हा हा मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत राज्यात पिछाडीवर आहे. राज्यात जिल्ह्याचा त्यानुषंगाने ३३ वा क्रमांक लागतो. त्यामुळे जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या विविध योजनांची प्रभावी व गुणात्मक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. परिणामस्वरुप हा निधी जिल्ह्याला त्वरेने मिळणे अपेक्षित होते; मात्र प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात वेळ गेल्याने हा निधी मिळण्यास काहीसा विलंब झाला होता. राज्यात २0११-१२ मध्ये मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या १२५ तालुक्यांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश होता. या तालुक्यातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी मानव विकासची बस सुविधा, ८ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींना सायकल, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रयोगशाळा साहित्य, अभ्यासिका निर्माण करून शैक्षणिक निर्देशांक वाढविण्यास प्राधान्य देण्यात आलेले आहे. आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी गर्भवती महिला व शून्य ते सहा वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती, जमातीमधील गर्भवती महिलांना आठव्या व नवव्या महिन्यात प्रसुतीदरम्यान बुडणारी त्यांची मजुरी मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रदान करणे, दरमहा किमान दोन आरोग्य तपासणी शिबिर घेऊन माता व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे या योजना राबविल्या जातात. सोबतच आर्थिक निर्देशांक वाढीसाठी फिरती माती परीक्षण प्रयोग शाळा, कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षण, सिंचन सुविधांच्या उपलब्धतेसाठीचे कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबविण्यात येतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांच्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीच्या आधारावर योजनांचे स्वरुप वेगळे आहे. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यात काही ठरावीक योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनांची अंमलबजावणी निधीअभावी रखडली होती. ती आता कार्यान्वित करण्यास यामुळे मदत मिळणार आहे. त्यातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढण्यास मदत होईल.
४.५0 कोटींचा निधी प्राप्त
By admin | Published: August 21, 2015 1:47 AM