लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध कारणांमुळे जिल्हयातील २० गावांतील रेशन दुकाने रिक्त झाले असून, सदर रेशन दुकाने सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते. विहित मुदतीत केवळ ९ गावांसाठी प्रस्ताव आले असून, उर्वरीत ११ गावांतील रेशन दुकानासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत. विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण २० गावांतील रेशन दुकानांचा परवाना रद्द झाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा, धारकाटा, तांदळी शेवई व उमरा(कापसे), मालेगांव तालुक्यातील कुरळा, झोडगा (खुर्द), वरदळी (खुर्द), किन्हीराजा, धमधमी, पांगरखेडा, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पांचाबा, मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा, बालदेव, मोतसावंगा, शेलगाव, स्वासीन, कारंजा तालुक्यातील पिंपळगांव (खुर्द), व मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी या गावांचा समावेश आहे.उपरोक्त २० गावांत नव्याने रेशन दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत वा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्यांतर्गत नोदंणी झालेली संस्था, महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांकडून सप्टेंबर महिन्यात जिल्हा पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते. यापैकी केवळ नऊ गावांतून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छानणी करण्यात आली असून, समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी सदर प्रस्ताव ठेवले जाणार आहेत. समितीच्या मंजूरीनंतर ९ गावांत रेशन दुकान सुरू होणार आहे.दरम्यान, उर्वरीत ११ गावांसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. या ११ गावांत रेशन दुकान सुरू करण्यासाठी पुन्हा जाहिरनामा काढणे आणि प्रस्ताव मागविणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाशिम जिल्ह्यात २० पैकी ९ रेशन दुकानांसाठी प्रस्ताव प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:56 PM
वाशिम : विविध कारणांमुळे जिल्हयातील २० गावांतील रेशन दुकाने रिक्त झाले असून, सदर रेशन दुकाने सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते
ठळक मुद्दे विहित मुदतीत केवळ ९ गावांसाठी प्रस्ताव आले.उर्वरीत ११ गावांतील रेशन दुकानासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहेत.