वाशिम (संतोष वानखडे) : रिसोड तालुक्यातील वाकद, सवड व खडकी (सदार) येथे लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाने जनावरे बाधित आढळून आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, प्रतिबंधासाठी १० हजार लस प्राप्त झाल्या. जनावरे बाधित आढळून आलेल्या परिसरातील पाच किमी अंतरावरील अन्य जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लम्पी त्वचारोग हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रिल्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. रिसोड तालुक्यातील काही जनावरांना ‘लम्पी’चा संसर्ग झाल्यानंतर पशुसवंर्धन विभागाने अलर्ट मोडवर येत तेथे लसीकरण करण्यात आले. २० पैकी जवळपास १० जनावरे बरी झाली असून, सध्या १० जनावरे या आजाराने बाधित आहेत. लम्पी आजार प्रतिबंधासाठी जिल्ह्याला १० हजार लस प्राप्त झाल्या आहेत.
बाधित जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिसरातील अन्य जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात जनावरे विक्रीस मनाइ करण्यात आली आहे तसेच जिल्हयातील सर्व गुरांचे बाजार बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सोमवारी काढले.