वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यानुसार, ५ एप्रिलपासून योजनेचे छापील अर्ज वितरित करण्यासाठी नगर परिषदेमध्ये केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी १०२ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शेट्टे, नगर अभियंता विनय देशमुख यांनी बुधवारी दिली.केंद्र शासनामार्फत २५ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घरे (नागरी) योजना अमलात आली. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यातील ५१ शहरांमध्ये वाशिम शहराचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. यासाठी काही ठिकाणी आॅनलाइन अर्जसुद्धा भरण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी केवळ २५ रुपये खर्च येत असताना काही लोकांकडून जास्त दर घेऊन फसवणूक केल्या जात आहे. नागरिकांनी फसवणूक होऊ नये, याकरिता नगर परिषद कार्यालयातील जुने आरोग्य विभाग, वाचनालयाच्या बाजुला कक्षाची स्थापना केली आहे. तेथे अर्ज देण्यापासून स्वीकारण्यापर्यंत मार्गदर्शन केल्या जात आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांची या योजनेसाठी अर्ज भरुन देण्यासाठी फी आकारुन लूट होऊ शकते. त्याकरिता नगर परिषदेमध्ये स्वतंत्र केंद्र उभारले असून, कोणत्याही प्रकारची फी घेण्यात येत नाही.- विनय देशमुख, नगर अभियंता, नगर परिषद, वाशिमसर्वांसाठी घरे-२०२२ या योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदीसह लाभार्थींचे छापील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरु झाली आहे. आपण याचा आढावा घेतला असता नागरिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी शेकडो अर्ज येणे व नागरिकांनी चौकशी करणे या योजनेचे फलीत आहे.- गणेश शेट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्याच दिवशी १०२ अर्ज प्राप्त
By admin | Published: April 06, 2017 2:02 AM