वाशिम : कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना कोविड काळातील मानधन तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज मिळावेत, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. हक्काचे मानधन आणि इतरही मागण्या मान्य होत नसल्याने आशांच्या पदरी निराशाच पडत आहे.
ग्रामीण भागात ४५० च्या वर आशा कार्यरत आहेत. कोरोना काळात शासनाच्या विविध मोहिमेत सहभागी होत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी कर्तव्य बजावले आहे. घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करणे, सर्वेक्षण करणे, रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरणअंतर्गत शिबिराला उपस्थित राहून काम करणे आदी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त नेमून दिलेल्या ७२ पेक्षा अधिक कामे करावी लागतात. असे असतानाही कोविड काळातील मानधन नियमित मिळत नाही. एकीकडे खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापरा करावा, हात वारंवार धुवावेत, हॅन्डग्लोजचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जाते, तर दुसरीकडे गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांनाच मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज मिळत नसल्याने, सुरक्षिततेचे उपाय कसे करावेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
०००
बॉक्स
काय आहेत मागण्या?
प्रतिदिन ३०० रुपये मानधन द्यावे, आशा स्वयंसेविकांना महिन्याला १८ हजार व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये वेतन द्यावे, आरोग्य विभागाशी निगडित काम असल्यामुळे मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज देण्यात यावेत आदी मागण्या आशा, गटप्रवर्तकांकडून होत आहेत.
०००
एकूण आशा स्वयंसेविका ९७०
एकूण गटप्रवर्तक ४८
०००
किमान मास्क, सॅनिटायझर तरी द्या हो !
कोट
आरोग्य विभागाशी निगडित काम असल्याने गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांना कोरोना काळातील प्रलंबित मानधन मिळावे; याशिवाय मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मास्क, सॅनिटायझरही मिळत नाही.
- वंदना हिवराळे,
आशा स्वयंसेविका
...
कोरोना काळातही वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सोबतीला आशा, गटप्रवर्तकांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या व आताही पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे किमान प्रलंबित मानधन, वाढीव मानधन तरी मिळायला हवे.
- संगीता काळबांडे
आशा स्वयंसेविका
.....
वाढीव मानधन मिळावे, प्रतिदिन ३०० रुपये मानधन मिळावे, मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज देण्यात यावेत, यासह विविध मागण्या आरोग्य विभाग व शासनाकडे केल्या आहेत. पण अद्याप मागण्या मंजूर केलेल्या नाहीत.
- वंदना चव्हाण
गटप्रवर्तक.
००००००००००