जिल्ह्यात घरगुती वीज वापर करणाऱ्या ७२ हजार २०० ग्राहकांकडे ४६ कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. यांसह १६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ९६ लाख आणि ५ हजार ७२० वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. यामुळे महावितरणची डोकेदुखी वाढली असून, वारंवार पाठपुरावा करूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान, या विषयावर नागपूर येथे १६ फेब्रुवारी रोजी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कार्यरत अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांकडून थकीत देयके व वसुलीसंदर्भात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी आढावा घेतला. दिवसागणिक वाढत चाललेली थकबाकी वसूल करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेन, असा इशारा त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............
बॉक्स :
वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई
अनेक महिन्यांपासून थकीत असलेली रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. त्यानुषंगाने १ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ६० पेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी; तर सुमारे ४० ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
.............
कोट :
नागपूर येथे १६ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत थकबाकीचा आढावा घेण्यात आला. थकबाकी वसूल करा किंवा कारवाईला सामोरे जा, असा इशारा त्यांनी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनीही थकबाकी अदा करून सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.