वाशिम, दि. 16- जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडलं. यापैकी ५० जणांकडून प्रत्येकी १२०० रुपयाप्रमाणे एकूण ६० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल केला तर उर्वरित २५ जणांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाने पोलीस, होमगार्डच्या सहकार्याने सहा वाहनांचा ताफा घेऊन शिरपूर येथे बुधवारी पहाटे दरम्यान विशेष मोहिम राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्या ७५ लोकांना पकडले. त्यांना शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. यावेळी ५० व्यक्तींकडुन प्रत्येकी १२oo रुपयाप्रमाणे एकुण ६००० रुपये रोख स्वरुपात दंड वसुल करण्यात आला. ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते, अशा उर्वरीत २५ लोकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड भरण्याची मुभा देण्यात आली. दंड न भरणार्यांवर पोलीस कारवाईचे पोलीसांना लेखी निवेदन देण्यात आले. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वच्छता कक्ष व पंचायत समितीच्या पथकाने राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या पत्नीचा दंड पतीने, सासूचा दंड सुनेने तर पाहुणे म्हणून आलेल्या जावयाचा दंड सास- यांनी भरल्याचे दिसून आले. शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.