- निनाद देशमुखलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यात अवैध रेती, गौण खनिज वाहतूक फोफावली असून, महसूल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत १३ प्रकरणांत ६.५७ लाखांचा दंड वसूल केला आहे.गौण खनिजाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधितांनी आवश्यक ते परवाने तसेच शासकीय नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. रिसोड तालुक्यातील काही नदीपात्रातून तसेच बुलडाणा जिल्हा व मराठवाड्यातील काही रेतीघाटांमधून रिसोडमार्गे अन्यत्र सर्रास रेती वाहतूक केली जाते. दोन ते तीन ब्रास रेती रॉयल्टीच्या पावतीवर जादा ब्रास रेतीची वाहतूक करणे, रॉयल्टीच्या पावत्या नसतानाही रेतीची वाहतूक रात्री १० ते पहाटे ५ या दरम्यान रिसोडमार्गे केली जाते. अवैध रेती वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून रिसोड तहसिल प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या दरम्यान राबविलेल्या मोहिमेत १३ वाहने दोषी आढळून आली. या सर्वांकडून सहा लाख ५७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, आता रॉयल्टी पावतीचा मुदत संपलेली असतानाही रिसोड तालुक्यातून अन्यत्र रेतीची वाहतूक रात्रीच्या सुमारास होत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.
ग्रामस्तरावर दक्षता समित्या गठीतअवैध रेती व गौण खनिज वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्तरावर गौण खनिज दक्षता समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून ते दर १५ दिवसाने तहसिलदारांना गौण खनिज उत्खनन व वाहतूकसंदर्भात माहिती देतात. ग्रामस्तरीय दक्षता समितीकडून योग्य ते सहकार्य मिळाले तर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीला आळा बसण्यास फारसा वेळ लागणार नाही.