लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील रिक्त १८२ पदे भरली जाणार असून, त्यासाठी पदभरती सुरू झाली आहे. अर्जापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांचा भरणा करण्यासाठी यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरण्याला सुरूवात झाल्यानंतर १६ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. विहित मुदतीत अर्ज सादर करण्यात अडचणी आल्याने अनेक पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेपासून वंचित होते. कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता २३ एप्रिल रोजी उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. वाशिम जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन व यांत्रिकी विभाग, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, वरिष्ठ सहायक (लेखा), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (पंचायत), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आदी विविध प्रकारच्या एकूण १८२ पदांकरीता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही मुदतवाढ अंतिम राहणार असून, यानंतर कोणतीही मुतदवाढ दिली जाणार नहाी. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.
वाशिम जिल्हा परिषदेत १८२ पदांसाठी भरती; २३ एप्रिलपर्यंत करता येणार आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:23 PM