सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७२ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरळ खरेदी पद्धतीने मोबदलाही अदा केला जात आहे; मात्र ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करताना त्यातून थकीत पीककर्जाच्या रकमेसह त्यावरील मार्चअखेरपर्यंत होणारी व्याजाची रक्कमही कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाकडून मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतक-यांमधून होत आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. त्यापैकी आजपर्यंत ७०० हेक्टरच्या आसपास जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित पात्र शेतकºयांच्या सुमारे ११०० खरेदी करून ‘रेडी रेकनर’ नुसार त्यांना मोबदला वाटप करण्यात आला आहे. दरम्यान, सदर मोबदला शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात असताना त्यातून शेतक-यांकडे असलेली पीककर्जाची थकबाकी कापून घेतली जात आहे. याबाबत शेतक-यांची कुठलीच नाराजी नाही; परंतु पीककर्जावरील व्याजही आधीच देय रकमेतून कपात केले जात असल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कैफियत नेमकी कुणाकडे मांडावी, याबाबत अनभिज्ञ असलेल्या शेतक-यांमध्ये यामुळेच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकºयांचा आता कुठलाच विरोध राहिलेला नाही. सरळ खरेदी पद्धतीने योग्य मोबदलाही मिळत आहे; मात्र संपादित केलेल्या जमिनीच्या रकमेतून पीककर्जाच्या रकमेसह व्याजाची रक्कम कपात करणे चुकीचे आहे. यामुळे काही शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गंगादीप राऊतशेतकरी संघर्ष समिती, वनोजा
जमीन संपादित करायची झाल्यास सातबारावर कुठलाही बोझा नसणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेतकºयांना मिळणाºया मोबदल्यातून पीककर्जाची रक्कम जमा केली जात आहे. तसेच कर्जमाफीची काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंतचे व्याजही जमा ठेवले जात आहे. फरकाची रक्कम संबंधित शेतकºयांना परत केली जाईल.- सुनील माळीक्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
सर्व बँकांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक!समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या जमीनधारकांकडे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी येत्या मंगळवारी बँक प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हा विषय मार्गी लागेल, असे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले.