वाशिम : खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या तथा ‘हाय रिस्क’ असलेल्या महिलांची प्रसूती करण्याची तसेच जन्माला आलेले बाळही पाॅझिटिव्ह असल्यास त्याच्यावर उपचाराची कुठलीच सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेस ‘रेफर टू अकोला’ केले जात आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसूतीकरिता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांनाही प्रसूतीपूर्वी किमान ‘रॅपिड ॲंटिजन टेस्ट’ करून घेण्याचे बंधन घालण्यात येत आहे. त्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास किंतू-परंतु न ठेवता संबंधित महिलेची प्रसूती केली जाते. मात्र, अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या तथा ‘हाय रिस्क’ असल्यास शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये अशा महिलांच्या प्रसूतीची तथा नवजात बाळ कोरोनाबाधित असल्यास त्याच्यावर उपचाराची कुठलीच सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या नातेवाईकांची पुरती तारांबळ उडत आहे. तथापि, किमान जिल्हा मुख्यालयी वाशिम येथे ‘हाय रिस्क’ कोरोनाबाधित गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
....................
कोट :
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्च महिन्यात २३६ ; तर एप्रिल महिन्यात २०९ महिलांची प्रसूती झाली. या सर्व महिलांची त्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेण्यात आली. त्यातील ५ ते ६ महिला ‘हाय रिस्क’ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. संबंधितांना खबरदारी म्हणून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता रेफर करण्यात आले. साैम्य लक्षणे असणाऱ्या महिलांची मात्र जिल्हा रुग्णालयातच प्रसूती केली जात आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम