राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांनी कोविडबाधितांवर उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर निश्चित करून दिले आहेत. मात्र, सेक्युरा हॉस्पिटल येथे कोविड बाधित रुग्णांवर उपचाराचे देयक वाजवी शुल्कापेक्षा जास्त दराने आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने सेक्युरा हॉस्पिटल येथे भरती असलेल्या व उपचार घेवून सुटी घेतलेल्या सर्व रुग्णांच्या देयकांची तपासणी केली. या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या अहवालावरून सेक्युरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या १४९ रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त दराने देयक आकारणी झाल्याचे समोर आले. सेक्युरा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी शासनाच्या अधिसूचनेतील निर्देशांचा भंग करून १४९ कोविड रुग्णांकडून आकारलेली देयकातील नमूद तफावतीची १० लाख ४८ हजार ७४ रुपये रक्कम संबंधित रुग्णांच्या बँक खात्यात १५ दिवसात जमा करावी. या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केला.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांच्या २९ जुलै २०२० मधील परिशिष्ट ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
०००००
सव्याज रक्कम मिळणार
जादा देयकाची आकारणी केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित रुग्णांना सव्यास रक्कम मिळणार आहे. हाॅस्पिटलमधून सुटी मिळाल्यापासून ते आजपावेतो ‘पीएलआर’ दराने म्हणजेच १० मार्च २०२० पासून १० जून २०२० पर्यंत १२.९० टक्के दराने व १० जून २०२० पासून १२.१५ टक्के दराने ही रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात पुढील १५ दिवसांत म्हणजेच २७ जानेवारी २०२१ पर्यंत जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला आहे.