लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा-मानोरा मतदार संघात शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या जरी मोठ्या प्रमाणात असली तरी ऐनवेळी चुरस निर्माण झाली तर मी शिवसेनेचा उमेदवार राहू शकतो, असे म्हणत विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कारंजातून आमदारकीसाठी तयारी दर्शविली आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे, शिवेनेत नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना एकप्रकारचा इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने रविवार, २ जुलै रोजी कारंजात रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तद्नंतर आयोजित पत्रकार परिषदेत महसूल राज्यमंत्र्यांनी वरील विधान केले. कारंजा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे बळकटीकरण होईल का, या प्रश्नावर संजय राठोड म्हणाले, की प्रकाश डहाके यांनी शिवसेनेत अद्याप अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. तसेच याबाबत मला देखील कुठलीच ठोस माहिती नसल्याचे ते म्हणाले.आगामी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी डॉ.शाम जाधव, डॉ.सुभाष राठोड, डॉ.महेश चव्हाण यांची सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चढाओढ सुरू आहे. तसेच इतर पक्षांमधील अनेक दिग्गज नेते देखील शिवसेनेत प्रवेश घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, ना. संजय राठोड म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माज्यावर पूर्णत: विश्वास आहे. त्यामुळे जर कारंजा मतदारसंघात उमेदवारांमध्ये जास्तच चढाओढ झाली तर पक्ष मला देखील उमेदवारी देवून निवडणूक लढण्याचे आदेश देवू शकतो. त्यासाठी आपण तयार आहोत, असे संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.
कारंजातून आमदारकीसाठी महसूल राज्यमंत्र्यांनीही दर्शविली तयारी!
By admin | Published: July 02, 2017 8:19 PM