वाशिम, दि. १६- बंद पडलेल्या आणि पुनरुज्जीवन करणे आवश्यक असलेल्या जिल्ह्यातील १0 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनाने मान्यता देऊन १४ कोटी ११ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर मंजूर केला; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चालढकलपणामुळे यातील एकाही कामाच्या निविदा प्रक्रियेस अद्याप सुरुवात झाली नसून कामे कधी सुरू होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानोरा तालुक्यातील म्हसणी १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील ९ गावे पाणीपुरवठा योजना, रिसोड तालुक्यातील करडा येथील २ गावे पाणीपुरवठा योजना, तसेच वारला येथील ४ गावे पाणीपुरवठा, अशा एकंदरित ४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनास ३१ डिसेंबर २0१६ ला शासनाने मान्यता दिली. त्यासाठी ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला. तसेच ९ फेब्रुवारीला कारंजा तालुक्यातील भामदेवी ३ गावे पाणीपुरवठा योजना, चांडस येथील ६ गावे पाणीपुरवठा योजना, दुबळवेल येथील ६ गावे पाणीपुरवठा योजना, जऊळका रेल्वे येथील ३ गावे पाणीपुरवठा योजना, वनोजा येथील ४ गावे पाणीपुरवठा योजना, तसेच चिचांबा भर येथील ४ गावे पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनासह देखभाल दुरुस्ती आणि संनियंत्रणासाठी शासनाने मान्यता दर्शवून ८ कोटी ८0 लाख २६ हजार ३00 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तथापि, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करावीत, त्यासाठी सर्वप्रथम निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत; मात्र करडा, वारला पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळून ३ महिने पूर्ण होत आहेत; तर उर्वरित पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीतील महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने साधी निविदा प्रक्रियादेखील अद्याप राबविलेली नाही. यावरून प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा उघड झाला आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा प्रश्न प्रलंबित!
By admin | Published: March 17, 2017 2:48 AM