स्काउट आणि गाइड ही चळवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी चळवळ असून, प्रामुख्याने शील संवर्धन, कौशल्य, आरोग्य व इतरांना साहाय्य या चार तत्त्वांद्वारे लहान मुलांवर संस्कार करून चारित्र्यवान नागरिक तयार करण्याचे कार्य शिक्षण चळवळीद्वारे केले जाते. यासाठी शाळांत महाराष्ट्र स्काउट आणि गाईड्स चळवळ शाळांमध्ये राबविण्यास कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, दरवर्षी ३१ डिसेंबरपूर्वी कब-बुलबुल, स्काउट-गाइडस्, रोव्हर-रेंजर युनिटची नोंदणी केली जाते, परंतु यंदा जानेवारी महिना अर्धा उलटला, तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ७ जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकही जारी केले होते. त्यानंतरही स्काऊट-गाइड्सच्या नोंदणीला गती आली नाही. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना या संदर्भात पत्र पाठवून ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
--------------
लेखी स्वरूपात अडचणी कळविण्याचे निर्देश
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्काउट्स आणि गाइड्स चळवळीअंतर्गत स्काउट-गाइड पथकाची नोंदणी १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याध्यापक व प्राचार्यांना देतानाच ही प्रक्रिया राबविण्यात काही अडचणी येत असल्यास, त्या तत्काळ लेखी स्वरूपात कळविण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच ही नोंदणी जिल्हा क्रीडा संकुल येथील वाशिम भारत स्काउट्स आणि गाइड्स जिल्हा कार्यालयात करावी, असेही सुचविले आहे.