वाशिम: जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असून, सकाळी ९ वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू होताच अवघ्या १५ ते २० मिनिटात नियोजित डोससाठी नोंदणी हाऊसफुल्ल होऊन जाते. यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लाभार्थी संख्या वाढल्याने आणि लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झाल्याने प्रत्येक जण लस घेण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येते. कोरोनावर लस हाच प्रभावी उपाय असल्याचे समोर आल्याने लसीसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, सकाळी ९ वाजता नोंदणी सुरू होते. अवघ्या १५ ते २० मिनिटाच्या कालावधीत नोंदणी हाऊसफुल्ल होते. जिल्ह्यात सहा केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असून, दररोज प्रत्येक केंद्रात २०० याप्रमाणे १२०० लाभार्थींना लस देण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, त्यातुलनेत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने आतापर्यंत केवळ ४,३५० च्या आसपास नागरिकांना लस देण्यात आली आहे.
०००००
१८ ते ४४ वयोगटातील किती जणांचे लसीकरण झाले -४,३५०
१८ ते ४४ वयोगटातील एकूण लोकसंख्या ४ लाख
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण टक्केवारी १.०८
००००
एक आठवड्यापासून प्रयत्न करतोय
कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असल्याने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी व्हावी म्हणून मागील एक आठवड्यापासून प्रयत्न करीत आहे. परंतु, अजून नोंदणी झालेली नाही.
- सूरज वानखेडे
००००
१ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मागील पाच दिवसापासून नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, काही वेळेतच संकेतस्थळ बंद होत असल्याने नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- स्वप्निल खंडारे
00000
लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत असतानाही अजून नोंदणी झालेली नाही. नोंदणी केव्हा होईल, याबाबत काही निश्चितता नसल्याने लस केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
- मिलिंद सरकटे
०००
सकाळी ९ वाजतापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होते. दररोज सहा केंद्रांमध्ये प्रत्येक २०० या प्रमाणात लस देण्यात येत आहे. उपलब्ध लसीनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी