लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव: येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा अरुण बळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे नगराध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले असून, या निवडीमुळे मालेगाव नगरपंचायतवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाल्याचे दिसून येत आहे. मालेगाव नगर पंचायतीमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमुळे राजकीय हालचालींना वेग आला होता. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने सर्वच प्रमुख पक्षाच्या घडामोडींना वेग आला होता. मात्र या पदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. यापूर्वी नगर पंचायतमध्ये काँग्रेसचे आमदार अमित झनक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलिप जाधव बाजार समिति सभापती बबनराव चोपडे यांच्या युतीची सत्ता होती. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. मागील निवडणुकीचे समीकरण बदलत. यावेळी राष्ट्रवादीसोबत शिवसेनेसह शिवसंग्रामचे २ सदस्य आणि भाजपाचा १ सदस्य आल्याने राष्ट्रवादी ची बाजू भक्कम झाली. परंतु या निवडणुकीत कांग्रेस आणि शिवसंग्रामकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात न आल्याने आता वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. नगराध्यक्षपदाची निवड अविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता उपाध्यक्ष पद कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदी रेखा अरुण बळी यांची अविरोध निवड झाल्यानंतर नगरपंचायत, जुन्या बसस्थानकावर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलिपराव जाधव बाजार समिती सभापती बबनराव चोपडे, नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष मिनाक्षी सावंत, अरुण बळी, बाळा सावंत दिलिप कोपुरवार, डॉ. निलेश गोपाल मानधने, रवि भुतडा, आशिष बियाणी, शिवाजी बळी, विष्णू भालेराव, युसूफभाई, शीतल खुळे, उमेश खुळे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.
मालेगाव नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा बळी अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:48 PM
मालेगाव: येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा अरुण बळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
ठळक मुद्देनगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने सर्वच प्रमुख पक्षाच्या घडामोडींना वेग आला होता. मात्र या पदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. नगराध्यक्षपदाची निवड अविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता उपाध्यक्ष पद कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.