लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत 'ग्रीन झोन'मध्ये असल्याने ४ मे पासून संचारबंदी व लॉकडाउनमध्ये बºयाच अंशी शिथिलता मिळताच जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजून गेली. पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही दिवसागणिक कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. वाशिम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असल्याने ४ मे पासून काही व्यवसायाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास मुभा मिळाली. केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, चहा टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे पुर्णपणे बंद राहणार आहेत. उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याने विविध प्रकारच्या वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांची वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथील बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, अनेकांनी मास्क किंवा रूमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.
शिथिलता मिळताच वाशिमच्या बाजारपेठेत नागरिकांची झुंबड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 12:18 PM