वाशिम : पिण्याचे पाणी पॅकींग करून ‘बिसलेरी’ नावाने व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या बॉटलमध्ये मृत पालीचे अवशेष आढळून आल्याचे रिजनल पब्लीक हेल्थ लेबॉरेटरी (नागपूर) यांनी केलेल्या चाचणीमध्ये मृत पालीचे अवशेष आढळून आले. लेबॉरेटरीचा अहवाल ग्राह्य धरून वाशिम येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाने तक्रारदाराला एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश २९ मे रोजी कंपनीला दिले आहेत. वाशिम शहरात वास्तव्यास असलेले श्याम झामनदास नेनवाणी यांनी अकोला ते वाशिम प्रवास करत असताना ६ सप्टेंबर २०१३ रोजी बिसलेरी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर या नावाने विक्री होत असलेल्या पाण्याच्या बॉटल्स विकत घेतल्या होत्या. या बॉटलपैकी एका बॉटलमध्ये मृत पाल असल्याचे आढळून आले. सदर पाणी ग्राहकाला पिण्यायोग्य नसल्याने व ग्राहकाची फसवणूक होत असल्याची तक्रार श्याम नेनवाणी यांनी अॅड. राकेश चंदनाणी यांच्या मार्फत वाशिम येथील ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचामध्ये १५ मे २०१४ रोजी दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर बिसलेरी कंपनीच्या पाणी बॉटलचा तत्कालीन तहसीलदार यांनी पंचनामा करून सदर बॉटल नागपूर येथील रिजनल पब्लीक हेल्थ लेबॉरेटरीमध्ये चाचणीसाठी पाठविण्यात आली. प्रयोगशाळेने १० मार्च २०१५ रोजी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, बाटलीमधील पाण्यामध्ये मृत पालीचे अवशेष आढळून आले. या पाण्यामध्ये सॅलमोनेली या विषारी घटकाबाबत चाचणी केली असता, तो घटक या पाण्यात आढळून आला. म्हणजे या चाचणी अहवालावरून सीलबंद पिण्याचे पाणी दूषित व विषारी होते, असा अहवाल न्याय मंचाला प्राप्त झाला. या अहवालाचा निष्कर्ष व दोन्ही पक्षाकडील वकिलांचे म्हणने ऐकून न्याय मंचाचे अध्यक्ष एस.एम. उंटवाले व कैलास वानखडे यांनी बिसलेरी कंपनीने तक्रारदार नेनवाणी यांना नुकसान भरपाईपोटी व न्यायिक खर्चासह एक लाख रुपये अदा करावे. तसेच बिसलेरी या ब्रॅण्डखाली पिण्याचे पाणी विक्रीचा व्यवसाय जनसामान्याच्या स्वास्थ्याचे संरक्षण करण्याकरिता अतिसुरक्षितपणे, काळजीपूर्वक करावा, असा आदेश वाशिम ग्राहक न्याय मंचने २९ मे रोजी पारित केला.
थंड पाण्याच्या बाटलीत आढळले मृत पालीचे अवशेष!
By admin | Published: June 06, 2017 1:13 AM