दिव्यरत्न संस्थेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यावसायिक जाहिरातीबाजीच्या फलकांमुळे वृक्ष सुकण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन. बहुतांश ठिकाणी वृक्षांवर लावलेले फलक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित हटवून वृक्षांचे विद्रुपीकरण थांबविण्यासह रस्ता रुंदीकरणाच्या पट्ट्यातील वृक्षतोड थांबवावी आणि अंमलबजावणीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहूद्देशीय संस्थेच्या वतीने शनिवार, १ जुलै रोजी देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नैसर्गिक आरोग्यवर्धक गुणधर्म अंतर्र्भूत असलेले वृक्ष मानवाला प्राणवायू, फळे, फुले, सावलीच देत नाहीत तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात. ही जाणीव अंगी बाळगून पर्यावरणास घातक ठरणाऱ्या घटकांचे पतन करून वृक्षांचे रक्षण केले पाहिजे. सद्यस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १ ते ७ जुलै हा सप्ताह वनमहोत्सव म्हणून राबविण्यात येत आहे. पर्जन्यमानासाठी ही बाब निश्चितच उपयुक्त असल्यामुळे ग्रामीण तथा शहरांच्या सौंदर्यातसुद्धा भर पडेल. नागरिकांनी वृक्षांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून संगोपन केल्यास शुद्ध प्राणवायू मिळेल तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल; परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यावसायिक जाहिरातीबाजीच्या फलकांमुळे सजीव वृक्षांचे आयुष्य घटत चालले आहे. त्याकरीता बहुतांश ठिकाणी वृक्षांवर लादलेले फलक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित हटविण्यासह वृक्षांचे विद्रुपीकरण थांबवावे, रस्ता रुंदीकरणाच्या पट्ट्यातील वृक्षतोड थांबवावी आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवळी दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहूद्देशीय संस्थेच्या हंसिनी उचित, ममता खाडे, अनिता पंडित, संगीता पिंजरकर, मनीषा दाभाडे यांच्यासह शशीभूषण खडसे, सुनील दिवटे, सतीश पारणकर, अभिजित लोखंडे, संदेश बांडे, एन.पी. सरकटे, सुनील कांबळे, प्रेमचंद कांबळे, अॅड. विजय बन्सोड आदींची उपस्थिती होती.
वृक्षांच्या आयुष्यवाढीसाठी फलके हटवा!
By admin | Published: July 03, 2017 2:29 AM