लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात लिलावाद्वारे अथवा अन्यप्रकारे निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या नझुल जमिनी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘फ्री होल्ड’ (भोगवटदार वर्ग-१) करण्यात येणार आहेत. याकरिता संबंधितांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.वाशिम व कारंजा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या याद्यांनुसार संबंधित भाडेपट्टेधारक व जमीनधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावण्याकरिता पाठविल्या आहेत. लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या नझुल जमीनधारकांनी नझुल जमिनीच्या कागदपत्रांसह आपले अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावेत. या बाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले.निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक कारणांसाठी देण्यात आलेल्या नझुलच्या जमिनींना भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरित केले जाणार आहे. त्यानुषंगाने संबंधित संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम
भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी होणार ‘फ्री होल्ड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:44 PM