राजुरा : परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला नांदेड महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या जड वाहनांमुळे राजुरा ते रिधोरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता नागरिकांचा रोष निर्माण होऊ नये म्हणून संबंधितांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात मुरूम टाकून मलमपट्टी केल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सद्य:स्थितीत रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता याचाही थांगपत्ता वाहनचालकांना लागत नसल्याने जीव मुठीत धरून दुचाकी तथा चारचाकी चालकांना वाहन चालविण्याची मोठी कसरत कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी जागोजागी खड्ड्यात साचल्याने वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा या मार्गावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. गौण खनिजाची वाहतूक करणारे चारचाकी वाहनसुद्धा रस्त्याच्या कडेला उटलेले आहेत. या मार्गावरून राजुरासह सुदी, अनसिंग, सुकांडा, खैरखेडा, आदी गावांतील शेकडोंच्या संख्येने दुचाकी तथा चारचाकी वाहने ये-जा करतात. राजुरा ग्रामस्थांनी पंधरवड्यापूर्वी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने अडवून एक दिवस वाहतूक बंद केली होती. तेव्हा संबंधितांनी रस्त्याची डागडुजी करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र, त्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यात केवळ मातीमिश्रित मुरूम टाकून मलमपट्टी केल्याने ग्रामस्थांसह वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
०००
कोट
महामार्ग निर्मितीच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या वाहनामुळे राजुरा रिधोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. खड्ड्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात मुरूम टाकून मलमपट्टी केली. संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.
आरती प्रकाश बोरजे
सदस्य ग्रामपंचायत राजुरा