लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील ८८३ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांमार्फत गुरूवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १८ जुलै रोजी बरखास्त करण्यात आल्या असून, जिल्हा परिषदांचा कारभार हाकण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांना (सीईओ) प्रशासक म्हणून तसेच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना पंचायत समितीचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील, असे संकेत आहेत. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी २३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. पाचही जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश देत, निवडणुकांसाठी मतदान केंद्रांच्या स्थितीसह पूर्वतयारीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सहारिया यांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना दिल्या होत्या.त्यानुसार वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील ८८३ मतदान केंद्र सुस्थितीत असून, निवडणुका घेण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.निवडणुक कार्यक्रमाकडे लागले लक्षजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयारीत राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तामार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आले असून निवडणुकांसाठी पूर्वतयारीचा अहवाल मागविण्यात आला. त्यानुषंगाने निवडणुका घेण्यासाठी मतदान केंद्रांच्या स्थितीसह पूर्वतयारी अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होतो, याकडे राजकीय क्षेत्रासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.सोशल मीडियावर आचारसंहितेसंदर्भात चर्चाजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने तयारीत राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्यानंतर सोशल मीडियात जिल्हा परिषद निवडणुक आचारसंहितेसंदर्भात संभाव्य भाकीत केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील निवडणुकविषयक स्थितीचा अहवाल राज्य निवडणुक आयुक्तांकडे सादर केल्याने कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे. संभाव्य निवडणुक लक्षात घेता काही इच्छूकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारही चालविला असल्याचे दिसून येते. दरम्यान, आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा अधिक झाल्याने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वाशिम येथील एका माजी जि.प. सदस्याने याचिका दाखल केल्याची चर्चाही सोशल मीडियात रंगत आहे. या याचिकेवर येत्या गुरूवारी चर्चा होणार असून, त्यानंतरच जिल्हा परिषद निवडणुक कार्यक्रम घोषित होईल की नाही, याचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चाही सोशल मीडियात रंगली आहे.
वाशिम जिल्हा परिषद मतदान केंद्रांचा अहवाल निवडणुक आयोगाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:54 PM