वाशिम : गृहउद्योगासाठी विविध फायनान्स कंपन्यांकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते लॉकडाउनमुळे भरता आले नाहीत; दुसरीकडे फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा सुरू आहे. याप्रकरणी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सत्यमेव जयते फाउंडेशन संघटनेने गुरूवारी केली.
संसाराला हातभार लागावा याकरीता गृहउद्योग, अन्य उद्योग उभारणीसाठी अनेक महिलांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून वैयक्तिक कर्ज घेतले. व्यवसायही सुरू केले. कर्जाच्या हप्त्याची नियमित परतफेडही सुरू होती. परंतू, कोरोना विषाणू संसर्गामुळे गत वर्षी २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी असल्याने छोटे, मोठे गृहउद्योग व अन्य उद्योग ‘लॉकडाउन’ झाले होते. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, अशी चिंता या महिलांना लागली होती. त्यानंतर बाजारपेठ पूर्ववत झाली. परंतू आता परत गत दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे घरभुती व्यवसाय, रोजमजुरी, छोटे उद्योग पूर्णपणे बंद पडले असून उपासमारीची वेळ आली. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने कर्जाचे हप्ते भरू शकत नाही. त्यामुळे फायनान्स कंपन्याचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सत्यमेव जयते फाउंडेशन संघटनेने गुरूवारी केली.