सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे; मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित ११९३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाला अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे. नागपूर ते मुंबई या ७१0 किलोमीटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ९८ किलोमीटरचे अंतर पार करून ५४ गावांना छेदून जाणार आहे. त्यासाठी २२00 शेतकर्यांकडून सुमारे १२00 हेक्टर जमिन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार, १ ऑगस्ट रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरळ खरेदीने भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. त्या दिवशी पाच शेतकर्यांच्या जमिनी संपादित करून संबंधितांना तत्काळ धनादेश वितरित करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविली जात असताना त्यास अपेक्षित यश अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या ४0 दिवसांत केवळ ९ शेतकर्यांच्या खरेदी झाल्या असून, एकूण ७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण होऊ शकले आहे. असे असले तरी येत्या आठवड्यापासून या प्रक्रियेस गती देऊन सप्टेंबरअखेर आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के भूसंपादन झालेले असेल, असा दावा उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी केला.
५४ पैकी १४ गावांच्या मूल्यांकनास मंजुरी!समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधील १२00 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ‘रेडी रेकनर’नुसार जमिनींचे दर निश्चित करण्यासाठी आतापर्यंत ५४ गावांपैकी १४ गावांच्या मूल्यांकनास जिल्हास्तरीय समितीने मंजुरात दर्शविली आहे. त्यात अलीर्मदापूर, पिंप्री मोखड, कतनापूर, इमामपूर, खेर्डी, बग्गी, निंबा जहागीर, आखतवाडा, देवचंडी, मजलापूर, एडशी, शेंदुरजना मोरे, अनसिंग, वरदरी खु. या गावांचा समावेश आहे. संबंधित गावांमध्ये आतापर्यंत १४ शेतकर्यांच्या जमिनींच्या खरेदी आटोपल्या असून, त्यांना २ कोटी ३५ लाख रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समृद्धी महामार्गाकरिता जमिनी देण्यास शेतकर्यांचा पूर्वीसारखा विरोध आता राहिलेला नाही. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस आता निश्चितपणे गती मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर महामार्गासाठी आवश्यक १२00 हेक्टर जमिनीपैकी किमान ५0 टक्के जमिनीचे संपादन करण्याचे उद्दिीट प्रशासनाने बाळगले आहे.- सुनील माळी,उपजिल्हाधिकारी, वाशिम.