वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी दुपारी शिताफिने कत्तलीसाठी वाहनात डांबून ठेवलेल्या ६१ गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी ७ आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ११.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजीज कुरेशी याचे स्वासीन रस्त्यावरील शेतात टिनाच्या शेडमध्ये काही गोवंश कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून नमूद ठिकाणी धाड टाकली असता, तिथे सोहेल खान साहेब खान कुरेशी (३४, रा. कुरेशीपुरा, नांदगाव पेठ, जि. अमरावती, ह.मु. मंगरुळपीर), सुफियान खान हारुण खान (२३), मुमताज अहमद अ. मुनाफ कुरेशी (४०, रा. टेकडीपुरा, मंगरुळपीर), अबरार अहमद अब्दुल सत्तार (४८, कसाबपुरा, मंगरुळपीर), मोहम्मद शकील मोहम्मद अकील (३५, रा. अस्थाना, कारंजा), शहजाद अब्दुल नबी शेख (३५, रा. काजळेश्वर, ता. कारंजा) असलेल्या या आरोपिंना ६१ गुरांसह ताब्यात घेण्यात आले; तर अजीज कुरेशी हजीब अब्दुल रहीम कुरेशी (मदार तकीया, मंगरुळपीर) हा फरार झाला आहे.
संबंधित आरोपिंकडून चार मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपिंवर कलम ३७९, ४२९ भादंवि, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५(अ) (२), ५ (ब) सह प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० मधील कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.