वाशिम : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यात फेरबदल करण्यात आले असून, शनिवारी (दि.२८) जिल्हा प्रमुखपदी डाॅ. सुधीर विठ्ठलराव कवर यांची वर्णी लागली आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर निष्ठावंतांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवित पक्ष बांधणीला ठाकरे गटाने प्राधान्य दिल्याचे दिसून येते. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे वाशिम जिल्हा प्रमुख म्हणून डाॅ. सुधीर कवर यांची नियुक्ती करण्यात आली तर मावळते जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्याकडे जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली.
जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून दिलीप जाधव यांचीही वर्णी लागली. डाॅ. कवर यांनी यापूर्वीही जवळपास १० ते १२ वर्षे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अन्याय झाला तरी पक्ष न सोडता निमूटपणे पक्षाचा आदेश मानून ते एक निष्ठावंत म्हणून ते पक्ष वाढीसाठी झटत राहिले. अखेर जिल्हाप्रमुख म्हणून पक्ष निष्ठेचे फळ मिळाले असून, आता कठीण व संघर्षाच्या काळात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. सध्या ते शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असून गटनेतेही आहेत. सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात जिल्हयात पक्ष बांधणी, संघटन वाढीवर भर देणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुधीर कवर यांनी व्यक्त केली.