लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला १ जुलैपासून सुरुवात झाली. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी जिल्ह्यातील सर्वच मार्गावरचे १५ हजारांच्यावर हजार वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांसाठी सर्व मिळून जवळपास १ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तथापि, महामार्गाची कामे अद्याप अर्ध्यावरही आली नाहीत. त्यामुळे यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यातील महामार्गावरील वृक्ष लागवड निरंक राहणार आहे.राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात २०१७ ते २०१९ दरम्यान ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लावण्यात आले, तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षांची लागवड करून एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासकीय विभागांसाठी स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण अंतर्गत सुरू असलेल्या कारंजा वाशिम, मंगरुळपीर-मानोरा, मंगरूळपीर -महान, मालेगाव -वाढोणा आणि वाशिम -हिंगोली या पाच महामार्गांचाही समावेश आहे. या महामार्गांच्या कामांसाठी जिल्ह्यातील १५ हजारांच्यावर झाडे आजवर तोडण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावर पूर्वीपेक्षा अधिक झाडे लावल्या जावीत, असा प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार महामार्ग कंत्राटदारांसाठी जवळपास १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठरविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणेही अशक्य आहे. त्यामुळे वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर एकाही वृक्षरोपाची लागवड होणार नाही.दरम्यान, जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट अपूर्ण राहू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उद्दिष्ट गृहीत न धरता ४० लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे पाच प्रकल्प अर्थात पाच रस्ते जिल्ह्यात होत आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. तर सुरू झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या वृक्ष लागवड शक्य नसली तरी, नंतर त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहेच. त्यातच शक्य त्या ठिकाणी सध्या वृक्ष लागवड करावी, अशा सुचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट मात्र पूर्ण करण्यात येणार आहे.- हृषिकेश मोडक,जिल्हाधिकारी, वाशिम