संतोष वानखडे,वाशिम : प्रकृती ठिक राहत नसल्याने व कोर्ट कचेरीच्या दगदगीमुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दामोधर गोटे यांनी दिलेला राजीनामा जिल्हा उपनिबंधकांनी ५ डिसेंबरला मंजूर केला. रिक्त झालेल्या सभापती पदासाठी १४ डिसेंबरला निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील राजकारण तापले आहे.
वाशिम बाजार समितीच्या संचालक पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक झाली होती. १८ संचालक पदाच्या वाशिम बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलचे नऊ संचालक निवडून आले तर शेतकरी सहकार पॅनलचे सहा संचालक निवडून आले. ३० मे रोजी घेतलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार दामोधर गोटे यांची सभापती तर गोवर्धन चव्हाण यांची उपसभापती पदी अविरोध निवड झाली होती. दरम्यान, प्रकृती ठिक राहत नसल्याने व कोर्ट कचेरीच्या दगदगीमुळे सभापती पदाला योग्य न्याय देवू शकत नसल्याचे कारण नमूद करीत सभापती दामोधर गोटे यांनी ५ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधकांनी हा राजीनामा मंजूर केल्याने, सभापती पद रिक्त झाले.
रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडीसाठी सर्व निर्वाचित संचालक मंडळ सदस्यांची १४ डिसेंबरला वाशिम बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली. सभापती पदासाठी निवडणूक होत असल्याने सहकार क्षेत्रातील राजकारणही तापले आहे. सभापती पदी कोण विराजमान होणार? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.