मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने गेल्या महिन्यात ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक केला आहे. वाशिम जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बंध वगळता सर्वप्रकारच्या बाजारपेठा व उद्योग-व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची मूभा आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, एसटीची रातराणी सेवा बंद असून, उद्योग-व्यवसायानिमित्त पुणे व मुंबई या ठिकाणी जाणारे नागरिक खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. महामंडळाच्या पुणे, औरंगाबाद मार्गावरील दिवसाच्या बसेसही रिकाम्या जात आहेत.
इन्फो :
एसटीच्या या रातराणी बसफेऱ्या बंद
जिल्ह्यातील दोन आगारांतून सुरू असलेल्या रातराणी बंद झाल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
- मंगरुळपीर ते पुणे
-वाशिम ते सिल्लोड
------------------
इन्फो :
जिल्ह्यात एसटीची स्लीपर बसच नाही!
जिल्ह्यात एसटी महामंडळातर्फे रातराणी बसफेऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. कारंजा, रिसोड या आगारातून पूर्वीपासूनच रातराणी बसफेऱ्या नाहीत, तर मंगरुळपीर आणि वाशिम आगाराच्या रातराणी फेऱ्याही बंद करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील एकाही आगारातून स्लीपर बस अद्यापही सुरू झालेली नाही. इतर आगारांतून येणाऱ्या शिवशाही, शिवनेरी बसफेऱ्याही आता बंद आहेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे.
-------------
इन्फो :
एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्त
एसटी महामंडळाच्या रातराणी आधीच बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत असून, ट्रॅव्हल्सचे तिकीट मात्र बसपेक्षा जास्त आहे. यामध्ये महामंडळाच्या मंगरुळपीर ते पुणे रातराणीचा तिकीट दर ६९५ रुपये होते. आता ही बस बंद आहे. तथापि, एसटी बस तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर अधिक असून, मंगरुळपीर ते पुणे प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर १२०० रुपयांपर्यंत आहे. हंगामाच्या काळात यात अधिकच वाढ होत असल्याचेही प्रवाशांकडून कळले.
-----------------
इन्फो :
प्रवासी म्हणतात, एसटीच्या सेवेअभावी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार
कोट : एसटी बसपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्तच असते; परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत एसटीची रातराणी बससेवाच नाही. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाने जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून प्रत्येक मार्गावर किमान एक रातराणी बस सुरू केल्यास प्रवाशांना आधार होईल आणि एसटीला उत्पन्न मिळेल.
- पंकज गोतरकर, प्रवासी
---
कोट : विविध कामानिमित्त आम्हाला अनेकदा नागपूर, पुणे अशा ठिकाणी जावे लागते. त्यासाठी रात्रीच्या प्रवासावर आमचा भर असतो; परंतु जिल्ह्यात एसटीची रातराणी बससेवाच नाही. त्यामुळे आम्हाला तिकिटासाठी अधिक पैसे खर्च करून खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. जिल्ह्यातील आगारातून रातराणी बसफेऱ्या सुरू कराव्यात.
- सूरज पाटील, प्रवासी