वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे गत दोन महिने प्रभावित झालेली रेल्वेसेवा अनलॉकच्या टप्प्यात आता पूर्ववत होत आहे. वाशिममार्गे सध्या चार रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या धावत असून, हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आरक्षण वेटिंगवर राहील, एवढाही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. वाशिममार्गे तीन पॅसेंजर आणि काही विशेष रेल्वेगाड्या धावतात. दुसऱ्या लाटेत जवळपास दोन महिने रेल्वेसेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सध्या वाशिममार्गे काचीगुडा-नरखेड ही इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच तिरुपती-अमरावती, जयपूर-हैैदराबाद,
जयपूर-सिकंदराबाद या चार रेल्वे गाड्यांच्या आठ फेऱ्या सुरू आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असला तरी आरक्षण वेटिंगवर राहील, असा भरभरून प्रतिसादही मिळत नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे अकोला-पूर्णा आणि अकोला-परळी या पॅसेंजर रेल्वे अजून सुरू झाल्या नसल्याने गोरगरीब प्रवाशांची मात्र गैरसोय होत असल्याचे दिसून येते.
०००
जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
काचीगुडा-नरखेड
तिरुपती-अमरावती
जयपूर-हैैदराबाद
जयपूर-सिकंदराबाद
नरखेड-काचीगुडा
अमरावती-तिरुपती
हैदराबाद-जयपूर
सिकंदराबाद-जयपूर
००००
सिकंदराबाद मार्गावर अल्प प्रतिसाद
जयपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला सिकंदराबादकडे जाताना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. पूर्वीच्या तुलनेत आता या मार्गावरील प्रवाशी संख्या घटली आहे. कोरोना संसर्ग कमी होत असल्याने या मार्गावरील प्रवासी संख्या वाढेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
०००००
इंटरसिटी एक्स्प्रेसला पसंती
काचीगुडा-नरखेड या इंटरसिटी एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येते. वाशिम ते अकोला ये- जा करणारे बहुतांश प्रवासी हे या एक्स्प्रेसला पसंती देतात.
०००००
वेटिंग नाही
वाशिममार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना आता कुठे प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसी किंवा अन्य रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित सीट मिळविण्यासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ प्रवाशांवर आली नाही.
००००
पॅसेंजर कधी सुरू होणार?
वाशिममार्गे अकोला-पूर्णा, अकोला-परळी, पूर्णा-अकोला, परळी-अकोला या पॅसेंजर रेल्वे धावतात.
सध्या या पॅसेंजर बंदच आहेत. त्यामुळे या मार्गावरील गोरगरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोरोना संसर्ग कमी होत असल्याने येत्या काही काळात पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि, पॅसेंजर रेल्वे नेमक्या कधी सुरू होणार, हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनी पॅसेंजर रेल्वेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
००००