संतोष वानखडे
वाशिम : ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केल्याने सोमवार, २८ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू होतील. निर्बंधाच्या या कालावधीत जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक नेमकी कशी होणार? सभा, कार्यक्रम, प्रचारावर कोणत्या मर्यादा येणार? याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. कोरोनाविषयक नियमावलीच्या निकषात जिल्ह्याचा समावेश पहिल्या स्तरात असल्याने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. दरम्यान, राज्यात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केला आहे. त्यामुळे २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू होणार असल्याने निर्बंधाच्या कालावधीत पोटनिवडणुकीवर काही मर्यादा येतील का, जाहीर सभा, प्रचारावर काही बंधने येणार, की पोटनिवडणूक लांबणीवर पडणार? याबाबत जिल्ह्यात तर्कविर्तक लढविले जात आहेत. निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले जाणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
०००
बॉक्स
‘पालघर’प्रमाणे न्याय मिळाला, तर पोटनिवडणूक लांबणीवर!
कोरोनाविषयक स्थिती पाहून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पाचपैकी चार जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला. पालघर जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्याने तेथे तूर्तास तरी निवडणूक लागली नाही. आता राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात झाला असून, २८ जूनपासून निर्बंध लागू होणार असल्याने पोटनिवडणूक लांबणीवर पडणार की काही बंधने, मर्यादा आणत पोटनिवडणूक घेणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००००००
जिल्हा प्रशासन मार्गदर्शन मागविणार!
शासनाच्या नवीन नियमावलीनुसार वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरावर झाल्याने पोटनिवडणूक नेमकी कशी घ्यावी, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासन मार्गदर्शन मागविणार आहे. जाहीर सभा, कॉर्नर बैठका, प्रचारादरम्यान होणारी गर्दी, जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी या अनुषंगाने मार्गदर्शन मागविले जाणार असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.
०००००००
आढावा बैठका, उमेदवारांची चाचपणी!
उमेदवारी अर्ज दाखल करण्याला २९ जूनपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष, आघाड्यांकडून उमेदवारांची चाचपणी, आढावा बैठका घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. एकीकडे उमेदवारांची चाचपणी, आढावा बैठका, तर दुसरीकडे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पुन्हा निर्बंध लागू, अशा परिस्थितीत नेमके काय करावे? असा पेच संभाव्य उमेदवारांसमोर उभा ठाकत आहे.
०००००
कोट बॉक्स
राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात केल्याने, २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू होणार आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक कशी घ्यावी, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम